औट्रम घाटात बस कठड्याला धडकली

Foto
▶ लोखंडी खांब ठरला तारणहार ५० प्रवासी थोडक्यात बचावले

कन्नड, (प्रतिनिधी) कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय मार्गावरील औट्रम घाटात रविवारी (दि. २३) रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर आगाराची बस वळण रस्त्यावर कठड्याला धडकून अपघात झाला. मात्र, कठड्यालगत असलेल्या लोखंडी पाईपच्या खांबाला बस अडकल्याने सुमारे दीडशे ते दोनशे फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. 


त्यामुळे बसमधील ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. लोखंडी खांबच प्रवाशांसाठी तारणहार ठरल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर आगाराची बस (एम एच ४० एन ९७२६) ही छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगावमार्गे सूरतकडे जात होती. दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान बस औट्रम घाटातील तीव्र वळणावर आली असता तांत्रिक बिघाड झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली.

धडकेनंतर बस पुढे सरकत दरीच्या दिशेने झुकली होती. मात्र त्या ठिकाणी उभारलेल्या लोखंडी पाईपच्या मजबूत
खांबाला बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये ५० प्रवासी प्रवास करीत होते. अपघातानंतर काही
प्रवाशांना खिडक्यांची काच फोडून सुरक्षित बाहेर काढले. यावेळी शिवाजी आरखे व शरद देशमुख, घाटमित्र चांगदेव राठोड, करण राठोड आदींनी मदतकार्य केले.

प्रथमदर्शनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या अधिक होती. अपघातात पाच महिलांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली असून, सर्व प्रवाशांना तत्काळ दुसऱ्या बसमध्ये बसून पुढील प्रवसाला रवाना केले. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चाळीसगाव ग्रामीण पोली पुढील तपास करीत आहेत. कोणत्य कारणाने बस धडकली याचा तपास सुरु आहे.